🔥 राज्य उत्पादन शुल्क विभागात खळबळ : मुंबईतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार व महिलांच्या शोषणाच्या गंभीर तक्रारी दाखल..

मुंबई / सांगली प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागातील मुंबईत कार्यरत दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध अवैध संपत्ती, पदाचा गैरवापर व महिलांच्या शोषणाच्या गंभीर तक्रारी करण्यात आल्याने संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य सरकार व संबंधित खात्याकडे स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, उत्पादन शुल्क विभागातील एक निरीक्षक, जो १९९८ पासून सेवेत असून गेली जवळपास २० वर्षे मुंबई–ठाणे परिसरातच कार्यरत आहे, त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून प्रचंड प्रमाणात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारानुसार, सदर अधिकाऱ्याकडे पुणे, मुंबई, ठाणे, सांगली, कराड, सातारा व नवी मुंबई येथे करोडो रुपयांची मालमत्ता असून ती बहुतेक नातेवाईकांच्या नावे करण्यात आली आहे.तसेच, एका संयुक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानसिक व नैतिक शोषण केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.तक्रारीत म्हटले आहे की, हा अधिकारी बदली, बढती आणि चौकशीच्या नावाखाली महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचे अनेकांनी तोंडी स्वरूपात सांगितले आहे.
🔹 काही महत्त्वाचे आरोप :

अवैध हप्ते व्यवस्था सुरू असल्याची गंभीर चर्चा
बेहिशेबी मालमत्ता – शेती, फ्लॅट्स, वाईन शॉप्स, बार व्यवसाय
महिला अधिकाऱ्यांचे शोषण व संरक्षण देण्याचे आरोप
छाप्यात मिळालेल्या मुद्देमालाची बेकायदेशीर विल्हेवाट
बाहेरील व्यक्तींशी आर्थिक व्यवहार व मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक

सदर प्रकरणामुळे उत्पादन शुल्क विभागातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, “या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे” अशी जोरदार मागणी होत आहे.
तक्रारदाराने स्पष्टपणे सांगितले आहे की, जर वेळेत आणि निष्पक्ष कारवाई झाली नाही, तर तो न्यायालयीन लढा व जनआंदोलन उभारणार आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप संबंधित अधिकाऱ्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
राज्य सरकार व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या प्रकरणात काय पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या