पुणे
सुप्रीम मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि राज्यात मोठं वादंग निर्माण झालं. कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी आज या निर्णयावर टीका करताना वेगळाच वाद ओढवून घेतला आहे. राज्यातील अनेक महिला नेत्याही दारू पित असल्याचा दावा करत कराडकर यांनी खळबळ उडवून दिली. या पार्श्वभूमीवर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोहचलेला आहे. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे,' असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
बंडातात्या कराडकर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्याबाबत कारवाई करण्याच्या सूचनाही रुपाली चाकणकर यांनी दिल्या आहेत. 'सातारा पोलिसांनी या वक्तव्याबाबत बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल ४८ तासाच्या आत आयोगास सादर करावा. तसंच बंडातात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा,' अशा सूचना चाकणकर यांनी दिल्या आहेत.
कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात 'दंडवत दंडुका' या आंदोलनाद्वारे सरकारच्या वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाचा विरोध केला आहे. मात्र यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली. 'पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांची मुले दारू पितात,' असा दावा त्यांनी केला.
0 टिप्पण्या