जीवे मारण्याची धमकी देत, गावठी पिस्तूल आणि गुप्तीचा धाक दाखवून लोकांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या चौघांच्या टोळीला शहर पोलिसांनी अटक केलीय. जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या (डीबी) पथकाने ही कारवाई केली असून विकृतांच्या ताब्यातील २ लाख २० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
सागर अरुण कांबळे (वय २२ रा. न्यू बुधवार पेठ भीम विजय चौक सोलापूर), बुद्धभूषण नागसेन नागटिळक (वय २६ रा. न्यू बुधवार पेठ आंबेडकर उद्यान समोर,आनंद चौक) सतीश उर्फ बाबूलाल अर्जुन गायकवाड (वय २५ रा. १२६, बुधवार पेठ मिलिंदनगर सोलापूर) अक्षय प्रकाश थोरात (वय २६ रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवार पेठ विश्वदीप चौक सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची तरुणांची नावे आहेत. डीबी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक केतन मांजरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, काही तरुण जुना तुळजापूर नाका ते रुपाभवानी मंदिरादरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्यांच्या जवळील पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण, लुटमार करीत आहेत. मिळालेल्या माहितीवरून डीबी पथकाच्या पोलिसांनी रुपाभवानी मंदिराकडून जुना तुळजापूर नाकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, धारदार गुप्ती,चार मोबाईल, दोन मोटारसायकली आढळून आल्या.
मोबाइलमध्ये आढळलेल्या व्हिडिओची दोन पंचांसमक्ष तपासणी केली असता, त्यामध्ये गावठी पिस्तूलचे व धारदार गुप्तीचा रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना धाक दाखवणे, त्यांना मारहाण व दमदाटी करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांना विवस्त्र करणे, अनैसर्गिक अत्याचार करण्यास भाग पाडणे, शेण खाऊ घालणे असे विक्षिप्त प्रकार केल्याचे आढळून आले. रेकॉर्डिंग करण्यात आलेले व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल केल्याचे दिसून आले. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात या विकृत गँगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यानंतरच त्यांच्या गुन्ह्याची सविस्तर उकल होणार आहे.
0 टिप्पण्या