पुणे : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. शांतिश्री धुलीपुडी पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांच्यावर दोन वेळा शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. २०११ आणि २०१७ अशा दोन वेळी मिळून एकूण सात वेतनवाढी रोखण्याची कारवाई केल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र या कारवाईकडे दुर्लक्ष करू केंद्र सरकारने डॉ. पंडित यांची जेएनयूच्या कुलगुरुपदी निवड केल्याचे स्पष्ट होत आहे.
केंद्र सरकारकडून जेएनयूच्या कुलगुरुपदी डॉ. शांतिश्री धुलपुडी पंडित यांच्या नियुक्तीची सोमवारी घोषणा करण्यात आली. जेएनयूच्याच माजी विद्यार्थिनी असलेल्या डॉ. पंडित विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू झाल्या आहेत. मात्र या घोषणेनंतर या निवडीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे. समाजमाध्यमांमध्ये त्यांनी शेतकरी, विद्यार्थी आदी घटकांबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिपण्या समाजमाध्यमांमध्ये पसरल्या. कुलगुरू निवड प्रक्रियेतील उमेदवारांबाबत त्यांच्या संबंधित विद्यापीठ-संस्थेकडून दक्षता समितीचा अहवाल मागवला जातो. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून केंद्र सरकारला डॉ. पंडित यांच्यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात आला.
विद्यापीठाने सरकारला सादर केलेल्या अहवालात गेल्या दहा वर्षांत डॉ. पंडित यांच्यावर दोन वेळा शिस्तभंगाची कारवाई केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. या अहवालानुसार डॉ. पंडित यांच्यावर २०११मध्ये पाच वेतनवाढी रोखण्याची आणि २०१७मध्ये दोन वेतनवाढी रोखण्याची कारवाई करण्यात आली होती.
0 टिप्पण्या