आज ता. 9/2/2022 रोजी कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचा शुभारंभ पार पडला. मला पहिल्याच दिवशी शेतकर्यांबरोबर प्रदर्शन पहायचा योग आला, विविध शेती उपयोगी स्टाॅलला भेटी दिल्या, राज्यातील शेतकर्यांनी आवर्जून पहावे असे विविध कंपन्यांचे प्रात्यक्षिक प्लाॅट पाहण्यासारखे आहेत.
होमिओपॅथीची शेती अशी नाविन्यपूर्ण कल्पना पण केव्हीके बारामती मध्ये आपणास पहायला मिळेल ती पण सेंद्रिय पद्धतीची. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माहीतीचा खजिना या प्रदर्शनात आहे, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन व आमचे मार्गदर्शक मा.श्री राजेंद्र दादा पवार यांचे नेटके नियोजन खरच वाखानण्या सारखे आहे. प्रक्षेत्रावरील विविध स्टाॅलला भेटी देऊन वेगवेगळ्या पिकांच्या प्रात्यक्षिकाची माहिती घेतली, तेथील तरुण नवउद्योजकांचे बरोबर चर्चा केली. या भव्य कृषी तंत्रज्ञान सप्ताह मध्ये एकशे दहा एकर क्षेत्रावर भाजीपाला व फुलांचे नाविन्यपूर्ण जातींची लागवड, संरक्षित शेतीचे विविध प्रयोग, खते देण्याच्या विविध पद्धती, एकात्मिक शेती प्रकल्प, मधुमक्षिका पालन, मत्स्य शेती, मोत्याची शेती, प्रक्रिया युक्त पदार्थ निर्मिती, नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स, Innovations, विविध जातिवंत जनावरे आणि पशुपक्ष्यांचे दालन, भरड धान्याच्या विविध जाती आणि त्याचे प्रक्रिया उद्योग, आयात-निर्यात मार्गदर्शन, औषधी वनस्पती लागवड, भाजीपाला कलमी रोपे, जातिवंत कलमी रोपांची फळरोपवाटीका, देश-विदेशातील न्यानो तंत्रज्ञान, देशी-विदेशी भाजीपाला, अत्याधुनिक मशनरी , ड्रोन द्वारे फवारणी तंत्रज्ञान, सेन्सॉर तंत्रज्ञानाचा वापर, टिशू कल्चर रोपे निर्मिती इत्यादी तंत्रज्ञान पाहून एकच ठिकाणी शेती व निगडित व्यवसाय पाहण्याची नामी संधी पुढील चार दिवस रविवार पर्यंत मिळणार आहे.
या सप्ताहादरम्यान संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शरद पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे , कृषी मंत्री दादा भुसे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत* यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार हे या दरम्यान भेटी देणार आहेत . तरी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी या कृषी तंत्रज्ञान सप्ताहात सहभागी होऊन लाभ घ्यावा.
0 टिप्पण्या