पुणे शहरातून एक वाईट बातमी समोर आली आहे. एका बांधकाम इमारतीच्या परिसरात लोखंडी सळईची जाळी कोसळल्याने सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर सुरुवातीला इमारतीचे बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडल्याचं बोललं जात होतं. पण वाडिया बंगला येथील बेसमेंटच्या राफ्टच्या लोखंडी सळईची जाळी कोसळून ही दुर्घटना घडल्याची माहिती थोड्या वेळाने समोर आली. या दुर्घटनेत सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. पण या दुर्घटनेत सात कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे कर्मचारी निलेश महाजन यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेत तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
संबंधित घटना ही गुरुवारी रात्री उशिरा येरवाड्यातील शास्त्रीनगर चौक वाडिया बंगला गेट नंबर आठ नजीक घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरु आहे.
संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरीक घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडूनही बचावकार्य जारी आहे. या घटनेनंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये अग्निशमन दलाचे जवान लोखंडी सळईंखाली दबल्या गेलेल्या मजुरांना बाहेर काढताना दिसत आहेत. त्यासाठी अग्निशमन दलाचे जवान त्यांच्याकडे असलेल्या कटरच्या माध्यमातून लोखंडी सळई कापताना दिसत आहेत. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्यात गुंतले आहेत. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित घटना ही नेमकी कशी घडली? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणाचा कदाचित सखोल पोलीस तपास केला जाईल. पण या घटनेत सात मजुरांचा बळी गेला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या