आधारकार्डने तारले, पण निवडणूक ओळखपत्राने घात केला..!१० वर्षे फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या...!



छोट्या कारणातून सहकारी ट्रकचालकाचा खून करून आरोपी फरार झाला होता. पोलिसांना सापडू नये म्हणून या आरोपीने नाव बदललं, नव्या नावाने अधारकार्डही तयार करून घेतलं. मात्र तपास करत असताना पोलिसांनीही चिकाटी सोडली नाही आणि १० वर्षांनी त्याला गाठलेच. तेव्हाही आधारकार्ड समोर करून तो मी नव्हेच अशी भूमिका आरोपीने घेतली. 

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेतील अधिकारी-अंमलदार गणेश इंगळे, राजेंद्र वाघ , संजय खंडागळे, बापुसाहेब फोलाने, भिमराज खसे, सुरेश माळी, रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार व बबन बेरड यांच्या पथकाने हा क्लीष्ट गुन्हा उघडकीस आणला आहे.

आरोपी भरत मारुती सानप (रा. खडकवाड जिल्हा बीड) हा आपली ओळख लपवून अभिमान मारूती सानप या नावाने कन्हेरवाडी, ता. परळी येथे राहत होता. त्याला अटक केल्यानंतर या गंभीर गुन्ह्याची आणि त्याने केलेल्या लपवाछपवीची माहिती पुढे आल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले. सुमारे ११ वर्षांपूर्वी नगरच्या एका ट्रकचालकाचा बुलडाणा जिल्ह्यात खून झाला होता. आरोपीने त्याचा खून करून सिंधखेडराजाजवळ त्याचा मृतदेह जाळून टाकला होता. तसंच त्याच्या ताब्यातील ट्रक चोरून नगरला आणला. त्यातील सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मालही आरोपीनी पस्पर विकला आणि नंतर फरार झाला होता. तेव्हापासून सिंधखेडराजा आणि नगरचे पोलीसही आरोपीचा शोध घेत होते. मात्र, १० वर्षे तो पोलिसांना सापडला नाहीच.

अलिकडेच या आरोपीबद्दल पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी सानप नाव बदलून कन्हेवाडीला राहत आहे. त्यानुसार पोलीस पथक तेथे गेले. त्याला नाव विचारले असता त्याने अभिमान मारुती सानप असे सांगितलं. त्या नावाचं आधारकार्डही दाखवलं. मात्र, आरोपी खोटे बोलत आहे, याची पथकातील अधिकाऱ्यांना खात्री होती. त्यामुळे त्यांनी शोधाशोध सुरू केली. इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तर त्याच्याकडे २००६ मधील मतदान ओळखपत्र सापडले. त्यावर त्याचे नाव भरत मारुती सानप असं असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच भरत मारुती सानप असल्याचे सांगितले आणि त्यानंतर संपूर्ण घटनाक्रमही पोलिसांना सांगितला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या