शिरूर - जांबूत येथील जोरी मळ्यात, घरामागे गेलेल्या महाविद्यालयीन युवतीवर बिबट्याने हल्ला केला. गळा पकडून बिबट्याने दीडशे फूटांपर्यंत फरफटत नेल्याने रक्तस्त्राव होऊन युवती जागीच मृत्युमूखी पडली. आज रात्री सातच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले. बिबट्याच्या मानवावरील हल्ल्याची या परिसरातील ही गेल्या महिन्याभरातील चौथी घटना आहे.
पूजा भगवान नरवडे (वय १९, रा. जोरी मळा, जांबूत, ता. शिरूर) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या महाविद्यालयीन युवतीचे नाव आहे. घरामागील उसाच्या फडात तीचा मृतदेह आढळून आला. महाविद्यालयात बीए च्या पहिल्या वर्षाला ती शिकत होती. वडील बाहेरगावी गेल्याने ती एकटीच घरी होती. सायंकाळी सातच्या सुमारास घरामागे लघूशंकेसाठी गेली असता उसाच्या फडात दबा धरून बसलेला बिबट्या तीला दिसला. तीने मदतीसाठी आरडाओरडा केला. परंतू तोपर्यंत बिबट्याने तिच्यावर झडप घातली. तीच्या आवाजाने घराशेजारील लोक व तरूणांनी धाव घेतली परंतू तोपर्यंत बिबट्याने गळ्याला धरून तीला फरफटत नेले होते. भर पावसात तरूणांनी हातात काठ्या, दांडके घेऊन उसात माग काढण्याचा प्रयत्न केला असता काही अंतरावर बिबट्या तीच्या मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे दिसले. तरूणांनी आरडाओरडा करीत काठ्या, दांडके उगारल्याने बिबट्या पळून गेला.
या भयानक घटनेची माहिती मिळताच जांबूत परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. ५ ऑगस्टला याच वस्तीवरील सचिन बाळू जोरी (वय ३५) यांचाही मृतदेह उसाच्या फडात आढळला होता. त्यांच्या शरीराचे हिंस्त्र पशूने लचके तोडले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी जांबूत येथील हरिश्चंद्र बारकू वाघमारे (वय ६२) व पिंपरखेडच्या पंचतळे परिसरात संजय नाना दुधवडे (वय ३०) या शेतमजूरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. गतवर्षी जांबूत येथील जोरी लवण परिसरात समृद्धी योगेश जोरी या अडीच वर्षीय चिमुकलीचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झाला होता.या घटनेनंतर, शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. सरपंच दत्तात्रेय जोरी, पोलिस पाटील राहुल जगताप व स्थानिकांनी बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेला दूजोरा दिला.
0 टिप्पण्या