राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागात अधिकाऱ्यांची मनमानी! अधिवेशन काळात मुख्यालय सोडल्याने दुय्यम निरीक्षकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस..!

 राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागात अधिकाऱ्यांची मनमानी! अधिवेशन काळात मुख्यालय सोडल्याने दुय्यम निरीक्षकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस

वादग्रस्त निरीक्षक सत्यवान गोगावले यांच्यावर अधीक्षक अतुल कानडे कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष

पुणे:

राज्य उत्पादन शुल्क पुणे -१ च्या कार्यक्षेत्रात प्रशासकीय शिस्तीचे जाहीर वाभाडे निघाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने कोणत्याही अधिकाऱ्याने मुख्यालय सोडू नये, असे कडक आदेश असतानाही 'आय' विभागाचे दुय्यम निरीक्षक अनिल यादव यांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. आपल्या मनमर्जीने आणि मनमानी पद्धतीने थेट तीन दिवस मुख्यालय सोडून गावी (कोल्हापूर) गेल्याप्रकरणी अखेर अधीक्षकांद्वारे त्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे.

सध्या सुरू असलेल्या अधिवेशन काळात सर्व शासकीय विभागांना हाय-अलर्टवर राहण्याचे आदेश असतात. मात्र, दुय्यम निरीक्षक अनिल यादव यांनी या आदेशांना हरताळ फासत आपल्या गावी कोल्हापूरला तीन दिवस मुक्काम ठोकला. विशेष म्हणजे, 'आय' विभागाच्या मुख्य निरीक्षकांच्या साहाय्यानेच हा सर्व प्रकार घडल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत अखेर प्रशासनाने यादव यांच्यावर नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवले आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी 'आय' विभागाचे निरीक्षक सत्यवान गोगावले असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी अत्यंत गंभीर अशा विषारी दारू विक्री प्रकरणामध्ये संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या गोगावले यांना वरिष्ठांनी वाचवले होते. मात्र, या धक्कादायक प्रकरणातून सुटल्यानंतरही गोगावले यांच्या कार्यपद्धतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. आपल्या विभागावर व कर्मचाऱ्यांवर त्यांचे कोणतेही नियंत्रण नसून, ते कमालीचे दुर्लक्ष करत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. प्रशासनाचे आदेश धाब्यावर मारणाऱ्या दुय्यम निरीक्षकाला गोगावले यांनी अभय का दिले? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

 तरी मूळ जबाबदारी असणारे आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या निरीक्षक सत्यवान गोगावले यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे हे या निष्काळजी आणि वादग्रस्त निरीक्षकावर काय कारवाई करणार, की नेहमीप्रमाणे या प्रकरणावर पडदा टाकला जाणार, याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या