राज्य उत्पादन शुल्क विभागात बदल्यांवरून खळबळ: मेडिकल ग्राउंडचा आधार आणि घाईघाईत घेतलेल्या 'DPC' मुळे चर्चांना उधाण..?
मुंबई:विशेष वृत्तसेवा
राज्य उत्पादन शुल्क विभागातील यंदाची बदली प्रक्रिया सध्या तीव्र वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. 'पुढारी' मधील वृत्तानुसार, विभागातील काही बडे अधिकारी मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमधील अतिशय महत्त्वाच्या कार्यकारी पदांवर, विभागीय भरारी पथकांत आणि राज्य भरारी पथकातील मोक्याच्या जागांवर वर्णी लावण्यासाठी 'विनंती बदल्यांचा' जोरदार वापर करत असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, अनेक अधिकारी स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या आरोग्याचे कारण पुढे करत वैद्यकीय प्रमाणपत्रांसह (Medical Grounds) सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. मात्र, २४ तास सज्ज राहावे लागणाऱ्या, अचानक छापे टाकणाऱ्या आणि अत्यंत धावपळीच्या असणाऱ्या भरारी पथकांसारख्या पदांवर अशा वैद्यकीय कारणांचे कारण देणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती कितपत योग्य आहे, असा गंभीर प्रश्न आता प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. अशा अधिकाऱ्यांना ताणतणाव कमी असलेल्या अकार्यकारी पदांवर नियुक्त करणे योग्य ठरेल, असाही एक सूर विभागात उमटत आहे.
या संपूर्ण बदली प्रक्रियेत आता एक नवीन आणि अत्यंत धक्कादायक वळण आले असून मंत्रालयातील गोटात याचीच मोठी चर्चा सुरू झाली आहे. विभागाचे मुख्य सेक्रेटरी (सचिव) रजेवर असताना, त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा उठवत अतिरिक्त कार्यभार (Additional Charge) असलेल्या सेक्रेटरींकडून चक्क शुक्रवारी तातडीने DPC (Departmental Promotion Committee)करून घेण्यात आली. इतकेच नव्हे तर या घाईघाईत केलेल्या डीपीसीच्या माध्यमातून काहींचे संवर्ग (Cadre) देखील बदलून घेण्यात आले आहेत.
नियमित सेक्रेटरी रजेवर असताना, अतिरिक्त कार्यभार असलेल्या अधिकाऱ्यांकडून अवघ्या काही तासांत ही प्रक्रिया का उरकण्यात आली? यामागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत? याबाबत आता विभागात संशयाचे धुके गडद झाले आहे.
काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे आणि लोकप्रतिनिधी व संघटनांच्या शिफारसपत्रांमुळे आधीच बदली प्रक्रिया रखडल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता हा 'शुक्रवारचा डीपीसी गेम' आणि मेडिकल ग्राउंडचा गैरवापर उघड झाल्याने पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत ? या संपूर्ण पडद्यामागच्या घडामोडींचे नक्की काय गोडबंगाल आहे आणि याचे खरे सत्य काय आहे, हे लवकरच जनतेसमोर येईल.

0 टिप्पण्या