गुन्हेगारांनी पोलिसांच्या वर्दीवर केला वार... गाडी रस्त्यातून बाजूला घे सांगितले म्हणून....!





पंढरपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज तर गुन्हेगारांनी पोलिसांच्या वर्दीवर वार केला आहे. गाडी रस्त्यातून बाजूला घे सांगितले म्हणून गुंडांनी पोलीस हवालदावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री साडेसात वाजल्याच्या सुमारास लक्ष्मी टाकळी भागात ही घटना घडली असून पोलीस कर्मचारी यात जखमी झाला आहे.

लक्ष्मी टाकळी परिसरात जगदंबा नगर येथे एका रस्त्यावर पोलीस हवालदार स्वप्नील वाडदेकर हे आपल्या वाहनावरुन निघाले होते. यावेळी रस्त्यात एक स्कार्पिओ गाडी उभी होती. हे वाहन बाजूला घेऊन रस्ता मोकळा करून द्या, असं वाडदेकर यांनी संबंधितास सांगितलं. इतक्यात एकाने 'तू मला सांगणार का' म्हणत वाडेदकर यांना मारहाण सुरू केली. यानंतर दुसऱ्या व्यक्तीने येऊन तलवारीने वाडदेकर यांच्यावर वार केला. परंतु, त्यांनी तो वार चुकवला. या झटापटीत वाडदेकर यांना दुखापत झाली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

जखमी अवस्थेत वाडदेकर यांना उपचारसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पंढरपुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या