शाळेतील मुलींची छेड काढणाऱ्या मुलाला जाब विचारला म्हणून मुलाने चक्क मुख्याध्यापकासह शिपायावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील मक्रनपुर येथे समोर आली आहे. तर या हल्ल्यात मुख्याध्यापक गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड शहरातील मक्रनपुर येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयातील मुलींची एक मुलगा सतत छेड काढत असे. त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक ए.पी.चव्हाण यांनी या मुलाला जाब विचारत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुलाने कोणताही विचार न करता थेट शाळेत तलवार आणून चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला.तर याचवेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेले शिपाई संतोष जाधव यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात मुख्याध्यापक चव्हाण गंभीर जखमी झाले असून, त्यांचा कान फाटला आहे. तर हाताच्या दंडावर दोन ठिकाणी मोठी जखम झाली आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर घटनेची माहिती मिळताच कन्नड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
घटनास्थळी मोठी गर्दी...
मुख्याध्यापक चव्हाण यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी परिसरात पसरताच पालकांनी मोठी गर्दी केली होती. तर अचानक घडलेल्या या घटनेमुळे नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी सुध्दा लोकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र घडलेल्या या घटनेनंतर शाळेतील इतर शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
0 टिप्पण्या