महावितरण कंपनीचा कार्यकारी अभियंता लाच घेताना "एसीबी'च्या जाळ्यात...!


इलेक्‍ट्रीक पोल बदलुन देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमचंद्र हरी नारखेडे (वय 57) असे गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. 

याप्रकरणी 38 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधकविभागाकडे तक्रार दिली होती. त्याच्याविरुद्ध मंचर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ठेकेदार आहेत. त्यांनी मंचर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडे इलेक्‍ट्रीक पोल बदलून मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, संबंधित अर्ज कार्यकारी अभियंता हेमचंद्र नारखेडे याच्याकडे गेला होता. नारखेडे याने पोल बदलून देण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे निश्‍चित झाले.मात्र तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत 12 मे रोजी "एसीबी'कडे तक्रार केली. त्यानुसार, त्यांनी या अर्जाची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी मंचर येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्विकारताना नारखेडे यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 "एसीबी'चे अधिक्षक राजेंद्र बनसोडे, अतिरीक्त पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने हि कारवाई केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या