पुणे
खडकी, चतुःशृंगीसह शहराच्या वेगवेगळ्या भागातील संवेदनशील शासकीय संस्थांच्या परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. पुण्यात त्यांच्याविरुद्ध नऊ गुन्हे दाखल असून अन्य जिल्ह्यातही त्यांच्याविरुद्ध चंदनाची झाडे चोरण्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अक्षय आरंडे, अंत्रोस पवार, अकीलाल पारधी, बियरलाल राजपुत (सर्व रा. कटनी, मध्यप्रदेश), अण्णा गायकवाड (रा. घोडेगाव, नेवासा, नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी येथील दारुगोळा कारखाना हा अतिसंवेदनशील संरक्षित क्षेत्र म्हणून ओळखले जाते. मात्र, याच संरक्षित क्षेत्राच्या परिसरात असलेली चंदनाची झाडे चोरीस जाण्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरु होता. तर मागील काही महिन्यांमध्ये त्यात वाढ झाली होती. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यातही वारंवार गुन्हे दाखल केले जात होते. याचदरम्यान, लष्कर, चतुःशृंगी, भारती विद्यापीठ परिसरातही चंदनाच्या झाडांच्या चोरीच्या घटना घडत होत्या. या पार्श्वभुमीवर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात होता. या घटनेची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने दखल घेऊन तपासाचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनीट चारचे पथक खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी खडकी परिसरातुन एका रिक्षातुन काही व्यक्ती संशयास्पदरीत्या पाहणी करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी रिक्षातुन एक प्रवासी उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्यावेळी पोलिसांनी रिक्षा चालकासह चार जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली, त्यावेळी त्यांच्याकडे घरफोडीसाठी लागणारी कटावणी, स्क्रु ड्राईव्हर,कटर, कोयते, कुऱ्हाडी व अन्य घातक हत्यारे आढळून आली.पोलिसांनी त्यांच्याकडील हत्यारांसह रिक्षा जप्त करुन त्यांना पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आरोपी चंदनाचे झाडी चोरी करण्यासाठी आल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांची अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा, चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक असे नऊ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी बियरलाल राजपुत याच्याकडून दोन गुन्ह्यातील 32 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. तर उर्वरीत सात गुन्ह्यातील मुद्देमाल त्यांनी नेवासा (नगर) येथील घोडेगाव येथे राहणाऱ्या अण्णा गायकवाड याच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी गायकवाड यालाही अटक केली. गायकवाड हा सराईत चंदन चोरी करणारा गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध शिक्रापुर, नगरमधील नेवासा, सोनाई व गुजरात येथे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या