पुणे - अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका नायझेरीयन नागरीकास अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून सव्वा बारा लाख रुपये किंमतीचे 82 ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ जप्त केला.चुक्वीमेका केनेडी एनियाकोरा ( वय 44, रा. खडकी रेल्वे स्टेशनजवळ, खडकी, मुळ रा.लगोस नायझेरीया) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी मारुती पारधी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (क्रमांक 1) पोलिस अधिकारी व कर्मचारी चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी औंधमधील ब्रेमेन चौकाकडून स्पायसर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचरा हस्तांतर केंद्राजवळ एक नायझेरीयन नागरीक अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी थांबला असल्याची खबर पोलिसांना मिळाली.
त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचला. त्यावेळी एनियाकोरा हा तेथे संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे 12 लाख 38 हजार रुपये किंमतीचे व 82 ग्रॅम 540 मिलीग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ, रोख रक्कम, मोबाईल आढळून आला. एनायकोरा हा अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे विक्री करीत असल्याचे त्याच्या चौकशीतुन पुढे आले. हि कारवाई पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, पोलिस कर्मचारी मारुती पारधी, मनोज साळुंके, संदिप जाधव, राहुल जोशी, पांडुरंग पवार यांच्या पथकाने केली.
0 टिप्पण्या