भिगवण
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील आनंद लॉजवर भिगवण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये वेश्या व्यवसाय याप्रकरणी हॉटेल मालक नामदेव बाळासो बंडगर,वय.४० वर्षे (रा.मदनवाडी,ता. इंदापूर,जि.पुणे),गजानन लक्ष्मण ठाकूर,वय.२४ वर्षे सध्या रा. आनंद हॉटेल,भिगवण, ता. इंदापूर जि.पुणे (मूळ,रा.गंगाखेड,जि. परभणी) यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३,४,५, ६,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले भिगवण अलीकडे अवैध व्यवसायामुळे बदनाम होत आहे. या ठिकाणी असलेल्या काही लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत आहे. संबंधित लॉजवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. परंतु, ही कारवाई अधिक कडक व्हावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण, मदनवाडी, भादलवाडी(ता. इंदापूर) स्वामी चिंचोली, खडकी (ता. दौंड) भागांमध्ये लॉजिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे अवैध कामांना आश्रय मिळत असल्याचे दिसून येते. अशांवरही कारवाई केली जाते. परंतु, ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे. ठोस कारवाईची मागणी नागरिक करीत आहेत. पोलिसांनी नुकताच आनंद हॉटेलवर छापा टाकून त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले. सदर महिलांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची कबुली महिलांनी दिली. याप्रकरणी नामदेव बंडगर (वय ४०, रा. मदनवाडी, ता. इंदापूर), गजानन ठाकूर (वय २४ रा. सध्या हॉटेल आनंद, भिगवण, ता. इंदापूर) यांच्या विरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलिस अंमलदार इन्कलाब पठाण, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, प्रिया पवार यांनी केली.
बातमी चौकट
हॉटेल व्यावसायिक चिंतेत भिगवण हे गाव पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एक महत्त्वाचे व्यापारी तसेच पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. या ठिकाणी डिसेंबर ते जून या कालावधीमध्ये परदेशी फ्लेमिंगो पक्षी येतात. त्यामुळे राज्यासह देशभरातील पर्यटक येथे येतात. सकारात्मक ओळख असताना मागील काही दिवसांमध्ये येथील लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायामुळे भिगवणचे नाव बदनाम होत असून त्याचा फटका पर्यटन व हॉटेल व्यवसायाला बसण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी आहे.
0 टिप्पण्या