महत्त्वाच्या बातम्या
राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विविध मुद्यावरून राज्यसरकारवर टीका केली. विधिमंडळात बहुमत सिद्ध केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्टपतीपदाची निवडणूक पार पाडल्यानंतर 19 तारखेला अधिवेशन घेऊ असे सांगितले. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करून 25 तारखेला अधिवेशन घेऊ असे म्हणाले. आज 25 तारीख आहे. पण, ना मंत्रिमंडळाचाच विस्तार झाला ना अधिवेशन झाले. बहुमत सिद्ध झाले मग मंत्रिमंडळ विस्तार करायला अडवले कुणी, असा सवाल त्यांनी केला.
भाजपकडून नेहमीच भूकंप होणार होणार असे विधान केले जाते. आता केला ना भूकंप. आली ना तुमची सत्ता. राज्य घेतले ना ताब्यात? एकनाथ शिंदेंना घेऊनही तुमची भूक भागली नाही का? तुमची भूक किती मोठी आहे ते तरी कळू द्या. सरकारमध्ये येण्यापुरती भूक होती ती धोंडा, दगड छाताडावर ठेवून भागवली. भला मोठा दगड नाही ठेवला नाही तर जीवच गेला असता, अशा शब्दांत भाजपला फटकारताना तुम्हाला जर एवढं बहुमत आहे तर अधिवेशन घ्यायला कोणी अडवलं आहे. तातडीने अधिवेशन घ्या आणि पूरस्थिती झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेऊन केंद्राचा निर्णय स्वीकारला असे म्हणाले. मात्र, त्यांच्याबद्दल आता काही जास्त बोलत नाही. कारण, त्यांच्या मातोश्री यांचे निधन झाले असून राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. विधिमंडळाचे अधिवेशन होईल तेव्हा सभागृहात सांगेन कुठे दगड ठेवला नि कुठे धोंडा ठेवला.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, यांच्या दोघांच्या हातात जास्त काही असे दिसत नाही. यांना दिल्लीमध्ये जाऊन जोपर्यंत हिरवा झेंडा मिळत नाही तोपर्यंत हे काही करू शकत नाही असे साधारण चित्र दिसतेय. अजूनपर्यंत मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही हे फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच सांगू शकतात. त्या दोघांनाच असं वाटतंय की आपण सरकार चालवतोय. चाललंय ते बरं आहे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला. ओबीसींना आरक्षण मिळाले ही आनंदाची बाबत आहे. पण सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे हे सगळे घडले असताना वेगवेगळे राजकीय पक्ष आमच्यामुळे हे झाले असे सांगण्याचा प्रयत्न करतात. मागणी सर्वांची होती. यात आमचा कुणाचा वाद नव्हता, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या