वडगाव निंबाळकर परिसरातील मंदिरांमध्ये चोरी करणारे मोकाट ; तपास उघड करण्यात पोलिस यंत्रणा अपयशी......?
बारामती तालुक्यातील सर्वाधिक गावे असणाऱ्या वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यातील तपास यंत्रणा पथक जिल्ह्यात अव्वल समजले जाते. तसे प्रमाणपत्रही जिल्हा अधीक्षकांनी दिले आहे. पण हा दबदबा कायम राखण्यात अपयश येत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात विविध मंदिरांमधून झालेल्या चोरांचा तपास लावण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. यामुळे भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
नीरा नदी काठावरील होळ येथील ढगाई मंदिरात दुसऱ्यांदा दानपेटीतील रक्कम चोरल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पहिल्यांदा चोरी झाली. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर कैद झाले होते. परंतु, याचा कोणताच तपास लागला नाही. त्यानंतर चोरट्यांनी दुसऱ्यांदा चोरी केली. यामधून होणाऱ्या चोरीतील रकमेपेक्षा मंदिरात येत असलेल्या लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या. लाटे येथील आईसाहेब मंदिरातून मुखवटे चोरीला गेल्याची घटना घडली होती. वडगाव निंबाळकर येथील पुरातन पंचायतन मंदिरातून पंचधातूच्या मूर्ती चोरीला गेल्या यापैकी कोणताही तपास उघड करण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरली. याशिवाय अनेक मंदिरांमधून छोट्या चोऱ्या झालेल्या आहेत. याची पोलिस दप्तरी नोंद नाही. सार्वजनिक विषय असल्यामुळे फारसे कोणी पोलिसांकडे तपासासाठी तगादा लावत नाही. परिणामी असे विषय मागे पडतात आणि चोरट्यांचे धारिष्ट वाढते. परिसरातील विविध शाळांमधून संगणक यंत्रणा चोरीला गेल्याच्या घटना घडल्या. गावोगावी बसवलेल्या सौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या. यावर वेळीच उपाययोजना व्हावी, अशी मागणी होत आहे.
वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे परिसरात जानेवारी ते जुलै सात महिन्यात घडलेले एकूण गुन्हे ३१० असून त्यापैकी चोरीचे गुन्हे - २३ आहेत तर यातील उकल झालेले गुन्हे १५ आहेत.
0 टिप्पण्या