गोवा कनेक्शन उघड: बनावट ‘संत्रा’ देशी दारूचे १००० बॉक्स जप्त – राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई..!

 गोवा कनेक्शन उघड: बनावट ‘संत्रा’ देशी दारूचे १००० बॉक्स जप्त – राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई...!




कागल | प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कागल विभागाने बनावट देशी दारूविरोधात मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई करत सुमारे १००० बॉक्स बनावट “संत्रा” देशी दारू जप्त केली आहे. या कारवाईत आतापर्यंत अंदाजे ₹1 कोटी 32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.






ही कारवाई निरीक्षक श्री. शंकर आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तपासादरम्यान बनावट मद्यनिर्मितीचे धागेदोरे थेट गोवा राज्याशी संबंधित असल्याचे समोर आले. त्यानंतर तपास पथकाने गोव्यात जाऊन बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे लेबल, बुचे (कॅप्स) आणि बॉक्सेस तयार करणाऱ्या दोन कंपन्यांवर कारवाई केली.तसेच, महाराष्ट्रासाठी बनावट लेबलिंग आणि पॅकेजिंग केल्याचा संशय असलेल्या “कॅनस” आणि “विजया” या दोन आस्थापनांवरही माननीय आयुक्तांची आवश्यक परवानगी घेऊन सीलची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती विभागीय सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


अधिकाऱ्यांच्या मते, इतर राज्यात जाऊन अशाप्रकारे प्रत्यक्ष कारखाने किंवा आस्थापने सील करणे ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते. अनेक वेळा परराज्यातील तपासासाठी स्थानिक पोलिस आणि प्रशासनाची परवानगी, तसेच न्यायालयीन आदेशांची आवश्यकता भासते. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यापक कारवाया क्वचितच होताना दिसतात.मात्र, या प्रकरणात तपास पथकाने गोवा राज्यात प्रत्यक्ष जाऊन पुरावे गोळा करत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत कारवाई केली. या घडामोडींची दखल गोवा राज्यातील काही माध्यमांनीही घेतल्याचे समजते.


राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई राज्यातील बनावट मद्यविक्री साखळीवर मोठा आघात मानली जात आहे. संबंधित आरोपी, पुरवठा साखळी आणि आर्थिक व्यवहारांचा तपास सध्या सुरू असून, येत्या काळात आणखी खुलासे होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या