पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागात हप्तेखोरीचा स्फोटक आरोप , मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश....!
पुणे | प्रतिनिधी
पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागातील कथित हप्तेखोरी, परवाना मंजुरीसाठी लाखो रुपयांची मागणी आणि नूतनीकरण प्रक्रियेत नागरिकांची होत असलेली कथित लूट याविरोधात गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या तक्रारी थेट राज्याचे वरिष्ठ नेते आणि मंत्री श्री. अजित दादा पवार यांच्यापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.तक्रारींनुसार, विविध प्रकारचे मद्य परवाने मंजूर करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध रकमेची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे. काही प्रकरणांमध्ये “एका दिवसात परवाना” देण्याच्या नावाखाली अधिक रक्कम घेतली जात असल्याचेही सांगितले जात आहे. तसेच परवान्यांचे नूतनीकरण करतानाही अधिकृत शुल्कांव्यतिरिक्त अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
या आरोपांची दखल घेत मंत्रिमहोदयांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विभागीय पातळीवर प्राथमिक चौकशी सुरू झाल्याचे समजते.दरम्यान, काही नागरिक आणि परवानाधारकांनी चौकशी पूर्ण झाल्यानंतर थेट मंत्रिमहोदयांना लेखी पुरावे आणि आर्थिक व्यवहारांचे तपशील सादर करण्याची तयारी दर्शवली असल्याचेही समजते. त्यामुळे या प्रकरणात पुढील काळात अधिक धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जर हे आरोप सिद्ध झाले, तर राज्य उत्पादन शुल्क विभागातील कामकाजाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. शासन स्तरावर कठोर कारवाई होणार का, याकडे आता सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या