'रक्षकच बनला भक्षक!' पुणे ACB च्या कार्यालयातून हप्तेवसुलीचा काळाबाजार; लाचखोरांच्या अभयामुळे थेट मानवी जीवनात विषारी रसायनांचा खेळ!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) भूमिकेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह; एकाच विभागाकडून 'मंथली हप्ते' गोळा केल्याचे खळबळजनक पुरावे हाती!
आर्थिक हप्त्यांच्या मोबदल्यात घातक आणि विषारी रसायनांची उघड विक्री; लाचखोरांच्या या साखळीमुळे सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात!
अधीक्षक आणि भ्रष्ट यंत्रणेविरुद्धचे सर्व पुरावे थेट NCHR कडे सादर होणार; "एसीबी ट्रॅप"नंतरच्या गुप्त आर्थिक उलाढालीचा पर्दाफाश लवकरच!
भ्रष्टाचार निर्मूलन करून सामान्य जनतेला न्याय देण्याची आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) विश्वासार्हतेला आता त्यांच्याच कार्यपद्धतीमुळे काळीमा फासला गेला आहे. पुणे एसीबीच्या नावाने एका विशिष्ट विभागाकडून नियमितपणे आर्थिक हप्ते (मंथली) उकळले जात असल्याची जोरदार चर्चा होती. या प्रकरणाची सखोल खात्री केली असता, एका विभागाकडून सातत्याने त्यांच्या नावावर पैसे गोळा केले जात असल्याबाबतचे आणि ते संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत असल्याबाबतचे भक्कम पुरावे हाती आले आहेत.
सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या भ्रष्ट लोकसेवकांच्या आणि लाचखोरांच्या आर्थिक हप्त्यांच्या पाठबळामुळेच संबंधित विभागात मानवी आरोग्यासाठी घातक असलेली विषारी रसायने कोणतीही भीती न बाळगता सर्रास विकली जात आहेत. केवळ काही पैशांच्या लाभासाठी आणि हप्त्यांच्या देवाणघेवाणीसाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जात असून, या बेकायदेशीर देण्याघेण्याच्या साखळीमुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. अनेक नागरिकांच्या मृत्यूसाठीसुद्धा हीच भ्रष्ट साखळी आणि त्यांना मूक संमती देणारे एसीबीचे अधिकारी पूर्णपणे जबाबदार आहेत.
जर पुणे ACB एकाच विभागाकडून हफ्ते घेत असेल, तर इतर विभागांची काय परिस्थिती असेल, हा संशोधनाचा विषय बनला आहे. या प्रकरणातील इतर विभागांचे पुरावेही लवकरच चव्हाट्यावर आणले जाणार आहेत. या संपूर्ण विभागाचे विभागप्रमुख म्हणून अधीक्षक (SP) हेच या सर्व गैरप्रकारांसाठी पूर्णपणे जबाबदार राहणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची मूक संमती आणि गप्प राहून मिळणारा पाठिंबा यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे. लोकसेवक कोणतेही कायदेशीर भय न बाळगता सर्रास हफ्ते गोळा करून ते योग्य ठिकाणी पोहोचवत आहेत.
या सर्व गंभीर प्रकरणाची आणि पुराव्यांची कागदपत्रे आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NCHR) कडे सोपवण्यात येणार असून, मानवी जीवनाशी खेळणाऱ्या या लाचखोरांच्या साखळीविरुद्ध कायदेशीर लढा तीव्र केला जाणार आहे.
पुढील भागात:
एसीबीचा ट्रॅप (Trap) यशस्वी झाल्यानंतर पडद्यामागे नेमकी कशी आर्थिक घडामोडी चालतात? अधिकाऱ्यांच्या गुप्त बैठका कुठे पार पडतात? आणि लाचेची रक्कम नेमकी कुठे स्वीकारली जाते? याचे सनसनाटी आणि खळबळजनक पुरावे लवकरच उघड केले जाणार आहेत... वाचत राहा..!

0 टिप्पण्या