पालघर उत्पादन शुल्क विभागात जुना वाईन शॉप व्यवहार पुन्हा चर्चेत – निवृत्त निरीक्षकांचा गंभीर आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी.


पालघर उत्पादन शुल्क विभागात जुना वाईन शॉप व्यवहार पुन्हा चर्चेत – निवृत्त निरीक्षकांचा गंभीर आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी.



मुंबई प्रतिनिधी-
पालघर, दि. २० मार्च – सन २००८ मध्ये झालेल्या एका वाईन शॉप भागीदारी व्यवहारावरून पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभाग अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सेवानिवृत्त निरीक्षक सुभाष पार्वतीबाई महादेव जाधव यांनी पालघर अधीक्षक कार्यालयाकडे दिलेल्या तक्रार अर्जात गंभीर आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, एल. के. वाईन्स या अनुज्ञप्तीधारक वाईन शॉप संदर्भातील भागीदारी प्रकरण सन २००८ मध्ये संशयास्पद पद्धतीने मंजूर करण्यात आले. मूळ परवानाधारक श्री. हरिश्चंद्र पंजाबी हे रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना त्यांचा जबाब नोंदवून भागीदारीचा प्रस्ताव पुढे नेण्यात आला आणि त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसांत नवीन भागीदारास मंजुरी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी नमूद केले आहे की, शासन नियमांनुसार आवश्यक शहानिशा न करता घाईघाईत शुल्क भरून भागीदारी मंजूर करण्यात आली. या प्रक्रियेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे अर्जात म्हटले आहे.
या प्रकरणात मयत परवानाधारकांचे वारस जगदीश हरिश्चंद्र पंजाबी यांनी देखील पूर्वी अनेक तक्रारी केल्या असून, त्यांच्या म्हणण्यानुसार करारनामे हे आजारी व बेशुद्ध अवस्थेत असताना करण्यात आले होते. यासंदर्भात सांताक्रूझ पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३०२, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब) सह ३४ अंतर्गत गुन्हा नोंद झाल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त निरीक्षक जाधव यांनी आपल्या अर्जात असा आरोप केला आहे की, त्या काळात त्यांनी बेकायदेशीर कामाला विरोध केल्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला व आजतागायत त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, संबंधित वाईन शॉपमध्ये पुन्हा वारसांना भागीदारी देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती मिळाल्याने, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील जुने प्रकरण पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता असून, चौकशीचे आदेश होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या