पुणे :
राज्यातील सर्वच बाजार समित्यांच्या आवरात नवीन लाल कांद्याची बेसुमार आवक होत असून सोलापूर बाजार समितीच्या आवारात १२०० ट्रक एवढी उच्चांकी आवक झाली. नवीन लाल कांद्याची बाजारात आवक वाढल्याने किरकोळ तसेच घाऊक बाजारात कांदा दरात घट झाली आहे. चालना नसल्याने कांदा निर्यातही ठप्प आहे. कांदा निर्यातीला चालना द्यावी, अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी असून परदेशात कांद्याला चांगले दर मिळतील, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
बाजारात नवीन लाल कांद्याची आवक वाढत असली, तरी केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी कोणतेही ठोस धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याची लागवड २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. उन्हाळ कांद्याची लागवड पुणे, नाशिक परिसरातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर करतात. डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका नवीन लाल कांद्याला बसला होता. त्यानंतर लागवड करण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील नवीन लाल कांद्याची लागवड चांगली झाली असून प्रतवारीही चांगली असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले. सध्या सर्व बाजार समित्यांच्या आवारात नवीन लाल कांद्याची मुबलक आवक होत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात चांगल्या प्रतीच्या दहा किलो लाल कांद्याला ३५० रुपये असा दर मिळाला होता. किरकोळ बाजारात सध्या एक किलो कांद्याची विक्री प्रतवारीनुसार २० ते ३५ रुपये दराने केली जात आहे. बाजारपेठेत कांद्याची आवक मुबलक होत असून कांदा निर्यातीस चालना न दिल्यास शेतकऱ्यांना अपेक्षेएवढे दर मिळणार नसल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.
कांदा निर्यातीस चालना नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षेएवढे दरही मिळणार नाहीत. घाऊक बाजारात कांद्याची आवक मुबलक होत असून कांदा दरवाढीची शक्यता तूर्तास नसल्याचे कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.
0 टिप्पण्या