राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागात ‘ACB’च्या नावाखाली हप्ते वसुलीचा आरोप — गंभीर शंका निर्माण

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागात ‘ACB’च्या नावाखाली हप्ते वसुलीचा आरोप — गंभीर शंका निर्माण..!



पुणे | प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पुणे यांच्या नावाचा आधार घेत मासिक स्वरूपात कथित हप्ते वसूल केले जात असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. संबंधित वर्तुळात या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपाधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एका दुय्यम निरीक्षकामार्फत विविध ठिकाणांहून नियमित स्वरूपात रक्कम गोळा केली जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या वसुलीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईपासून संरक्षण मिळते असा दावा करून पैसे मागितले जात असल्याचा आरोप आहे.

या प्रकरणामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे (ACB) यांच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. जर खरोखरच ACB चे नाव वापरून अशी वसुली होत असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे.
यामध्ये पुढील प्रश्न उपस्थित होत आहेत:
▪️ACB पुणे यांचे नाव वापरण्यामागे नेमका उद्देश काय?
▪️संबंधित वसुली प्रकरणात ACB मधील कोणत्याही अधिकाऱ्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का?
▪️वरिष्ठ पातळीवर या बाबत माहिती असूनही दुर्लक्ष तर होत नाही ना?
स्थानिक पातळीवर या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे. जर आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर हा प्रकार केवळ भ्रष्टाचाराचाच नव्हे तर शासकीय यंत्रणांच्या नावाचा गैरवापर करण्याचाही गंभीर गुन्हा ठरू शकतो.दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या