धक्कादायक निकाल: तामिळनाडूमधील कोठडीतील मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षायुथुकुडी..

धक्कादायक निकाल: तामिळनाडूमधील कोठडीतील मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा
युथुकुडी..



प्रतिनिधी:
देशभरात मोठ्या चर्चेत राहिलेल्या तामिळनाडूतील कोठडीतील मृत्यू (Custodial Death) प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक आणि अत्यंत कठोर असा निकाल देत ९ दोषी पोलिस कर्मचाऱ्यांना मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावली आहे. तब्बल ६ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर हा निकाल लागला असून, यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी:
जून २०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान युथुकुडी येथे पी. जयराज (५९) आणि त्यांचा मुलगा बेनिक्स (३१) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. लॉकडाऊनचे नियम मोडून मोबाईल दुकान काही मिनिटे जास्त वेळ उघडे ठेवले, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
अमानुष मारहाणीत मृत्यू:
कोठडीत असताना या दोघांवर पोलिसांनी अत्यंत निर्दयीपणे मारहाण केल्याचा आरोप होता. गंभीर जखमी झालेल्या बेनिक्सचा २२ जून रोजी, तर वडील जयराज यांचा २३ जून २०२० रोजी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.

या प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि सहा कॉन्स्टेबल अशा एकूण ९ जणांना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने हा प्रकार "दुर्मिळातील दुर्मिळ" (Rarest of Rare) मानत, रक्षकच भक्षक बनल्याचे नमूद केले आणि सर्व दोषींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने सादर केलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला.

पोलिस कोठडीत होणाऱ्या अत्याचारांविरोधात हा देशातील एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय मानला जात आहे. वर्दीच्या जोरावर सामान्य नागरिकांवर अन्याय करणाऱ्यांसाठी हा कडक इशारा असल्याचे मत व्यक्त होत आहे.
या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, मानवाधिकारांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या