पिंपरीत एका २९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी संबंधित तरुणाच्या तोंडावर धारदार शस्त्राने वार करत त्याचं डोकं ठेचल्याची घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली. तरुणाची केलेली अवस्था पाहून पोलिसांना देखील धक्का बसला. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून घटनेचा तपास सुरू आहे.
रात्री ११ च्या सुमारास मृत पिंटू कुमार सहदेव शहा (वय २९) याचा भोसरी येथील गुळवेवस्ती परिसरात मृतदेह आढळून आला. येथील स्थानिक नागरिकाने मृतदेह पाहिला असता, घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा केला. मारेकऱ्यांनी तरुणाची केलेली भयंकर अवस्था पाहून पोलीस पथकालाही धक्का बसला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाच्या डाव्या डोळ्याजवळ दगडाने घाव,तर तोंडावर धारदार शस्त्राने वार केलेले आहेत. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. सुरुवातीला तरुणाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता मयत व्यक्ती पिन्टू शाह असल्याचं निष्पन्न झालं.मृत तरुणाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. ही हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली ? याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही संशयास्पद आढळतंय का ? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तसेच मृत तरुणचा कोणाशी काही वाद होता का ? याचाही तपास केला जात आहे.

0 टिप्पण्या