वाई:
अभ्यास घेण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने आपल्या पंधरा वर्षीय अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याची घटना वाई तालुक्यात समोर आलीय.पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार वाई पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पीडितेच्या मामाला अटक करण्यात आली आहे. मामा-भाचीच्या नात्याच्या काळिमा फासणाऱ्या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
ही घटना ऑक्टोबर महिन्यात घडली असून पीडित मुलगी गरोदर असल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाबद्दल तिच्या घरच्यांना समजलं. संबंधित अल्पवयीन पीडितेचा अभ्यास घेण्याच्या बहाण्याने मामाने तिच्यावर अनेकदा अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. सर्वात आधी ऑक्टोबर महिन्यामध्ये या व्यक्तीने आपल्याच भाचीवर बलात्कार केला. तसेच ही घटना कोणाला न सांगण्याची धमकी देत पुन्हा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तिच्यावर अत्याचार केला.
संबंधित मुलीला त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी पीडितेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता ती गरोदर असल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी मामाला गावातून ताब्यात घेतले. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे करत आहेत.
0 टिप्पण्या