राज्य सरकारने यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, "आज रविवार 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ( 1981 चा अधिनियम 26) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार 7 फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे".
लतादीदी यांच्या पार्थिवावर मुंबईच्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत. लतादीदींच्या प्रभूकुंज निवासस्थानापासून शिवाजी पार्कपर्यंतचा अखेरचा प्रवास सुरु झाला आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत हजारो चाहते सहभागी झाले आहेत. रस्त्याच्या दुतार्फा उभे राहून हजारो नागरीक आपल्या लाडक्या लतादीदींना श्रद्धांजली वाहत आहेत.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. लता दीदींच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
0 टिप्पण्या