दिंडोशी पोलिसांनी काल रात्री NDPS कायद्यान्वये कारवाई करत 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. तर दोन महिलांना समन्स बजावला आहे. संबंधित आरोपींनी गांजाची तस्करी करत सर्व माल अंधेरी परिसरातील एका गोदामात लपवला होता. येथूनच आरोपी मुंबईतील विविध परिसरात गांजाची विक्री करत होते. संबंधित ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली असता, गोदामात 23 किलो गांजा आढळला आहे. या गांजाची बाजारातील किंमत तब्बल 2 लाख 30 हजार रुपये इतकी आहे.
छापेमारी केल्यानंतर विविध पुराव्याच्या आधारे पोलिसांनी गांजा तस्करीत सहभागी असणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. तर दोन महिलांना समन्स बजावला आहे. विशेष बाब म्हणजे या गांज्याच्या गोदामाची रखवाली एक मूकबधिर व्यक्ती करत होता. तर आरोपी महिला गांज्याच्या पुड्या तयार करून त्या बाजारात विक्रीसाठी पाठवत होत्या.
मुंबईतील गोकुळ धाम परिसरात एक व्यक्ती गांजा विकत असल्याची माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सूरज राऊत यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 ग्रॅम गांजा आढळला. यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली. यावेळी त्यानं गांजा तस्कर आणि त्यांच्या ठिकाणाची माहिती पोलिसांना दिली.
आरोपीनं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील एक गोदामात छापेमारी केली. याठिकाणी पोलिसांना तब्बल 23 किलो गांजा आढळला आहे. या गांजाची रखवाली एक मूकबधिर व्यक्ती करत होती. या छापेमारीत पोलिसांनी घटनास्थळावरून 3 जणांना अटक केली तर दोन्ही महिलांना समन्स बजावण्यात आलं आहे. अश्रफ सय्यद (30), महेश शांतीलाल बिंद (33) (मुकबधिर), मोबीन मेहबूब सय्यद (25) अशी अटक आरोपींची नावे आहेत. संबंधित सर्वजण संतोष नगर परिसरातील रहिवासी आहेत. मुख्य आरोपी अश्रफ सय्यद याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
0 टिप्पण्या