जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त.
घोटी–वाडीवऱ्हे शिवारात ऑक्टोबर २०२५ मध्ये घडलेल्या अपहरण, ठार करण्याची धमकी, खंडणी आणि तब्बल ४०० कोटी रुपयांच्या नोटा असलेल्या कंटेनरची कथित लूट या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी हरीश खेडकर यांच्या देखरेखीखाली हा तपास जलदगतीने करण्यात येणार आहे. ‘सकाळ’ने रविवार (ता. ११) च्या अंकात या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलिस व प्रशासनामध्ये अचानक हालचाली वेगाने वाढल्या आणि एसआयटी नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला.
फिर्यादीनुसार गंभीर आरोप
नाशिक रोड येथील संदीप दत्ता पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित
जयेश कदम,
विशाल नायडू,
सुनील धुमाळ,
विराट गांधी,
जनार्दन धायगुडे (मुंबई)
यांनी त्यांचे अपहरण करून पिस्तूलचा धाक दाखवत कुटुंबीयांना ठार करण्याची धमकी दिली. तसेच वरीलपैकी चौघांनी ४०० कोटी रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा असलेल्या कंटेनरची लूट केल्याचा आरोप फिर्यादीवरच केला, अशी माहितीही समोर आली आहे.
फिर्यादीत नमूद केलेला चलनातून बाद झालेल्या ४०० कोटी रुपयांच्या रकमांचा उल्लेख अत्यंत धक्कादायक असून या मुद्द्यामुळे प्रकरणाला वेगळेच गांभीर्य प्राप्त झाले आहे. तपास यंत्रणा आता या नोटा नेमक्या कुठून आल्या आणि त्या कुठे हलवल्या जात होत्या, याचा माग काढण्यावर केंद्रीत झाली आहे.
स्वरूप गंभीर; प्रभावशाली व्यक्तींचा सहभागाची शक्यता
प्रकरणाचे स्वरूप अत्यंत संवेदनशील, उच्च आर्थिक मूल्याचे असून यात राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक स्तरावरील प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर तपास निष्पक्ष, स्वतंत्र आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक व्हावा यासाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तपास समितीत अनुभवी वरिष्ठ अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर तज्ज्ञ व फॉरेन्सिक-तांत्रिक विश्लेषकांचा समावेश आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे शोधन, डिजिटल पुरावे, फोन रेकॉर्ड, लोकेशन ट्रेसिंग, तसेच कंटेनरच्या हालचालींचे तांत्रिक विश्लेषण केले जाणार असल्याचीही माहिती मिळते.
जिल्हा पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सर्वांगाने, कोणताही दबाव न घेता व कोणालाही पाठीशी न घालत काटेकोरपणे केला जाईल.

0 टिप्पण्या