पुणे, प्रतिनिधी :
पुणे उत्पादन शुल्क विभागामध्ये भ्रष्टाचार, मनमानी कारभार आणि तक्रारी दाबण्याचे गंभीर प्रकार सुरू असल्याचा आरोप एका तक्रारदाराने केला आहे. अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी गुप्त बैठक घेऊन तक्रारदारांच्या विरोधात कारवाई करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपअधीक्षक सुजित पाटील यांनी अधीक्षक कार्यालयामध्ये काही अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत विभागातील भ्रष्टाचार व गैरव्यवहारांबाबत आलेल्या तक्रारी दाबण्यासाठी तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे मनमानी कारभार झाकण्यासाठी चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे (सुनील चव्हाण) अधीक्षकांविषयी चुकीची माहिती देऊन तक्रारदाराच्या विरोधात खोटे अहवाल सादर करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचेही समोर येत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या चौकशीसाठी सुजित पाटील व गोगावले यांचीच चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची विभागात चर्चा आहे.
यामुळे पुणे विभागात “अधीक्षक हे केवळ नावापुरते असून प्रत्यक्ष कारभार सुजित पाटील यांच्याच नियंत्रणाखाली चालतो,” अशी चर्चा रंगली असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, तक्रारदाराने माननीय मुख्य सचिव , आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या मार्फत करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. निष्पक्ष चौकशी झाल्यास विभागातील अनेक भ्रष्ट प्रकार उघडकीस येतील, असा दावा तक्रारदाराने केला आहे.
या प्रकरणामुळे उत्पादन शुल्क विभागातील अंतर्गत कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या