खडक पोलीस ठाण्यातील चौकशी सुरू असतानाच प्रमोद कांबळे यांना महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकात आणण्याचे प्रयत्न?


खडक पोलीस ठाण्यातील चौकशी सुरू असतानाच प्रमोद कांबळे यांना महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकात आणण्याचे प्रयत्न?

"चौकशीच्या भोवऱ्यात असलेल्या अधिकाऱ्याला भरारी पथकात आणण्याचे प्रयत्न; विभागात खळबळ"


विशेष प्रतिनिधी | पुणे

राज्य उत्पादन शुल्क विभागात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, अमरावती येथील निरीक्षक प्रमोद कांबळे यांना महाराष्ट्र राज्य भरारी पथक, मुंबई येथे आणण्यासाठी काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

विशेष म्हणजे, प्रमोद कांबळे व इतर दोघांविरोधात पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात त्यांच्या स्वतःच्या विभागातील एका जवानाने गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली असून त्या तक्रारीची चौकशी सध्या सुरू असल्याचे समजते. या चौकशीमुळे संबंधितांच्या पायाखालची वाळू सरकल्याची चर्चा विभागात रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रमोद कांबळे हे यापूर्वी महाराष्ट्र राज्य भरारी पथकात दुय्यम निरीक्षक म्हणून कार्यरत असताना एका प्रकरणात आरोपींकडून कथितरित्या बनावट कागदपत्रे तयार करून घेण्यामागे काही प्रभावशाली सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची भूमिका असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या प्रकरणातील सत्य बाहेर येऊ नये आणि संभाव्य धागेदोरे समोर येऊ नयेत म्हणूनच प्रमोद कांबळे यांची पुन्हा भरारी पथकात नियुक्ती करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, अशा बदलीस मंजुरी मिळाल्यास महत्त्वाची कागदपत्रे नष्ट होण्याची, पुरावे गायब होण्याची तसेच सुरू असलेल्या तपासात गंभीर अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खडक पोलीस ठाण्यातील चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रमोद कांबळे यांना महाराष्ट्र राज्य भरारी पथकात कोणत्याही परिस्थितीत नियुक्त करू नये, अशी मागणी विभागातील विविध स्तरांतून पुढे येत आहे.

आता या संपूर्ण प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, प्रधान सचिव आणि संबंधित मंत्र्यांची भूमिका काय राहणार, तसेच चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणताही निर्णय घेतला जाणार का, याकडे संपूर्ण विभागाचे लक्ष लागले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या