पुणे कल्याणीनगर येथील पबबाहेर पुन्हा राडा...! प्रसिद्ध 'एलिफंट अँड को' बारबाहेर तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल......!


कल्याणीनगर येथील पबबाहेर पुन्हा राडा! प्रसिद्ध 'एलिफंट अँड को' बारबाहेर तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल......!





पुणे:
पुण्यातील पब आणि बार संस्कृती तसेच रात्रीच्या वेळी होणाऱ्या हुल्लडबाजीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध 'एलिफंट अँड को' (Elephant & Co.) बारच्या बाहेर रात्रीच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा आणि हाणामारीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (इन्स्टाग्रामवर) प्रचंड व्हायरल होत असून पुणेकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बारच्या आतमध्ये काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद तिथेच न थांबता बारच्या बाहेर रस्त्यावर आला. बारबाहेर पडताच दोन्ही गटांतील तरुणांनी एकमेकांवर हल्ला केला आणि रस्त्यामध्येच एकमेकांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
या राड्यादरम्यान परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. बारचे सुरक्षारक्षक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी हा वाद मिटवण्याचा आणि तरुणांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र नशेत धुंद असलेले तरुण कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

या संपूर्ण हाणामारीचा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये तरुण भररस्त्यात एकमेकांना बेदम मारहाण करताना आणि शिवीगाळ करताना स्पष्ट दिसत आहेत. या व्हिडिओमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर आणि पब संस्कृतीमुळे उद्भवणाऱ्या सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



नागरिकांनी प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या पार्ट्यांवर नियंत्रण ठेवून कारवाई केली पाहिजे.
या घटनेनंतर परिसरातील स्थानिक रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मोठ्या आवाजातील संगीत आणि वाढत्या गोंधळामुळे रहिवाशांचा रोष वाढत असल्याचे सांगितले आहे. उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या मनोरंजन स्थळांमुळे परिसरातील शांतता भंग होत असून नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.पब आणि बारबाहेर रात्रीच्या वेळी होणारी हुल्लडबाजी आणि अशा भांडणांमुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. तसेच अशा हुल्लडबाजांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या पार्ट्यांवर नियंत्रण ठेवून कारवाई  करावी .अशी मागणी जोर धरत आहे. 

याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे राडा करणाऱ्या तरुणांची ओळख पटवून त्यांचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या