बीडमधील सामाजिक वनीकरण विभागातील कारवाई; ४० लाखांच्या 'बनावट' नोटा वापरून ACB ने रचला नाट्यमय सापळा...
बीड (विशेष प्रतिनिधी):
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वनसेवा परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आणि सध्या बीड येथे सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असलेला वर्ग-१ चा अधिकारी श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड याला तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत असलेल्या या 'एमपीएससी टॉपर' अधिकाऱ्याच्या अटकेने बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
वृक्षलागवडीची प्रलंबित बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी अधिकारी श्रीनिवास लखमावाड याने ४५ लाख रुपयांच्या भल्यामोठ्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने २९ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने अत्यंत चलाखीने योजना आखली. तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणि उरलेल्या ४० लाख रुपयांच्या मनोरंजनाच्या (खेळण्यातील बनावट) नोटांचा बंडल देण्यात आला. गुरुवारी रात्री लखमावाड याच्या निवासस्थानी ही रक्कम स्वीकारताना दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले.
जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या बीड दौऱ्यावर असतानाच ही मोठी कारवाई झाली. दिवसभर पालकमंत्र्यांच्या शासकीय बैठकांना हजेरी लावून लखमावाड रात्री उशिरा आपल्या निवासस्थानी पोहोचला होता. बैठक आटोपून घरी परतताच लाचेची रक्कम स्वीकारणे त्याला महागात पडले. या धडक कारवाईनंतर एसीबीच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे स्वतः बीडमध्ये दाखल झाल्या असून, याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मूळचा नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद (रत्नाळी) येथील रहिवासी असलेला श्रीनिवास लखमावाड हा बी.टेक. इंजिनिअर आहे. २०१६ च्या एमपीएससी वनसेवा परीक्षेत तो अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम आला होता. "अथक परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर यश मिळवता येते," असा सल्ला स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना देणारा हा अधिकारी आज तब्बल ४५ लाखांच्या लाचखोरी प्रकरणात गजाआड झाल्याने हळहळ व संताप व्यक्त होत आहे.

0 टिप्पण्या